नवी दिल्ली – प्राप्ती करदात्याकडून विवरण सादर करताना झालेली चूक सुधारण्यासाठी अतिरिक्त कर भरून दुरुस्त विवरण दोन वर्षापर्यंत सादर करता येणार आहे. याचा अर्थ या करदात्याला करमाफी दिली असा होत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्रालयाने केले आहे.
महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, विवरण भरताना काही नजर चूक झाली असेल तर अशा करदात्यांनी दुरुस्त विवरण 12 महिन्याच्या आत सादर केल्यानंतर शिल्लक उत्पन्नावर अतिरिक्त 25 टक्के कर आणि व्याज द्यावे लागेल. 24 महिन्यात दुरुस्त विवरण सादर केल्यास 50 टक्के अतिरिक्त कर आणि व्याज द्यावे लागेल. यामध्ये करदात्याला माफी देण्याचा संबंध येत नाही.
आगामी काळामध्ये ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे. बरेच उद्योजक आणि करदाते विवरण भरतांना काही बाबी विसरून जातात. त्यांना त्या दुरुस्त करण्याची संधी हा नव्या निर्णयामुळे मिळणार आहे. सध्या जर दुरुस्तीची वेळ आली तर या विषयावर बरेच न्यायालयीन वाद विवाद होतात.
ते वादविवाद टाळले जावेत याकरिता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आता उरलेला कर जमा करण्यासाठी कर अधिकारी संबंधित करदात्यास नोटीस पाठवणार नाहीत. त्यामुळे कर विभाग व करदात्याचे संबंध अधिक चांगले होतील असे त्यांनी सांगितले.