नगर, (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातून शिक्षणासाठी येणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वसतीगृहाची इमारत होणे गरजेचे आहे. सदर जागा कर्जत शहराजवळ असून, गेली अनेक वर्षे निधी पडून आहे. कर्जत शहराची विकास योजना तयार करतांना जोगेश्वरवाडी येथील गट नं.१८१, प्लॉट नं.६२ या जागेवर सामाजिक न्याय विभाग राज्य शासन हे आरक्षण टाकण्यात यावे. अन्यथा कर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
कर्जत नगरपंचायत हद्दीतील जोगेश्वरवाडी येथील भुखंडावर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने वसतीगृहाचे आरक्षण टाकण्यात यावे, या मागणीचे निवेदन सहा.समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे यांना देण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक भास्कर भैलुमे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल शेलार, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, देवीदास खरात आदी उपस्थित होते.
या वेळी झालेल्या चर्चेत कर्जतसाठी रमाई आवास योजनेंतर्गत २४६ घरकुले मंजूर झाली आहे, परंतु बांधकाम परवानगी अभावी त्यांची कामे प्रलंबित आहे, त्याबाबतचे पैसेही नगर पंचायतकडे हस्तांतरीत झालेले आहेत. बांधकामास परवानगी मिळावी, असे भैलुमे यांनी सांगितले.