नगर – शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न अजूनही कायम आहे. तात्पुरती नाही तर पक्क्या अतिक्रमणांचाही मुद्दा समोर आला आहे. प्रशासनाने मात्र शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. आज महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जेसीबीच्या मदतीने गौरी घुमट येथील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यामध्ये पक्के बांधकाम असलेले घर, दोन रुम आणि एका लोखंडी जिन्याचा समावेश आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहरातील गौरी घुमट येथे महापालिकेच्या मालकीची जागा आहे. या जागेवर उद्यानाचे आरक्षण आहे. मात्र, काही जणांनी या जागेवर बेकायदेशीर कब्जा करत त्यावर घराची बांधकामे केली होती. तसेच रस्त्याला अडथळा होईल अशा पद्धतीने जिना उभारला होता. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देत न्यायालयाने 20 एप्रिल रोजी सदरचे पक्के अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने सदरची अतिक्रमणे हटविण्यात आली.
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी पथकाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने पक्के बांधकाम काढून टाकले. या कारवाई दरम्यान कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या नेतृत्वात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी मनपा आयुक्त आणि उपायुक्तांनीही येथे येऊन पाहणी केली.