रांजणगाव गणपती (पुणे)- करोनाबाधित रुग्णाची माहिती लपवण्याचा कारणावरून शिरूर शहरातील एका डॉक्टरसह लॅबचालक आणि सोनेसांगवी येथील संबंधित रुग्णावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील हायरिक्स व्यक्तींमध्ये सोनेसांगवी येथील एका व्यक्ती होती. या व्यक्तीशी रांजणगाव येथील प्राथमिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती तपासली असता, या व्यक्तीने शिरूर येथील डॉ. भडंगे (पूर्ण नाव माहित नाही, बालाजी रुग्णालय, शिरूर) या खासगी डॉक्टरकडून तपासणी करून घेतली व कृष्णा नावाच्या लॅबमधून करोना तपासणी केली. यामध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर घरी उपचार केले व कुठल्याही सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रांजणगाव पोलीस ठाण्यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार संजय गायकवाड, चंद्रकांत काळे, विजय शिंदे यांनी केली.पुढील तपास किशोर तेलंग हे करीत आहेत.