रेडा – इंदापूर तालुक्यातील काही भागात व्हायरल इंफेक्शन वाढल्याने सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात करोनाचा संसर्ग मानगुटीवर असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. उपचारासाठी रुग्णांची गर्दी वाढल्याने दवाखाने हाऊसफुल्ल आहेत.
सर्वसामान्य नागरिक आरोग्याच्या चिंतेने त्रस्त झाला आहे. व्हायलर व कोरोनाच्या महामारीत इतर व्यवसाय डबघाईस आले असले तरी इंदापूर तालुक्यात वैद्यकीय व्यवसाय तेजीत आहेत. उपचारासाठी रुग्णांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
कोरोनाच्या मागील एक वर्षाच्या काळातील मार्च महिन्यात लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. किरकोळ व मध्यम मात्र अत्यावश्यक सेवेत न मोडणारे उद्योगधंदे डबघाईस आले. गावाकडील व शहरातील संपूर्णपणे अर्थव्यवस्था पूर्णतः मोडकळीस आली. लॉकडाऊन लावल्याने करोनावर नियंत्रण मिळविणे शक्य नसल्याचे शासन व प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली. सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर अर्थव्यवस्थेची घडी नीट बसायला लागली होती. तो हिवाळ्याच्या शेवटी पुन्हा एकदा करोनाचा प्रकोप दिसू लागला. त्यात आता व्हायरल इंफेक्शनेही डोकेवर काढले आहे.
व्हायरलमुळे इम्युनिटी कमी होवून संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जी लक्षणे व्हायरलची आहे, तीच लक्षणे करोनाची आहेत. तीच लक्षणे संसर्गालाही लागू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इतर व्यवसायावर परिणाम झाला असला तरी आरोग्य सेवा तेजीत आहे. आठ ते दहा दिवसांच्या उपचारासाठी 2 ते 4 लाख रूपयांचे बिल खासगी कोविड रुग्णालयाकडून काढण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये औषधांची पुरेशी उपलब्धता नाही.असे सर्रासपणे बोलले जात आहे.
त्या प्रमाणात रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेताना दिसत नाहीत. ज्या व्यक्तींना करोना झाला आहे. त्या कुटुंबाला खासगी दवाखान्यातील त्यामुळे कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पैसा की जीव या चक्रव्यूहात सर्वसामान्य रुग्ण अडकला आहे. कुटुंबाच्या कुटुंबे बाधीत होत आहेत. त्यांच्यावरील उपचाराच्या खर्चाने इंदापूर तालुक्यातील मध्यमवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
करोना रुग्णांसाठी मोफत उपचार, मात्र,
इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी एस. ए. गावडे म्हणाले की, इंदापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील जे नव्याने करोना रुग्ण सापडत आहेत. त्यांनी खासगी दवाखान्यांमध्ये जाऊन अधिकचे पैसे घालवण्याची गरज नाही. त्यांच्यावरील सर्व उपचार शासनाच्या वतीने इंदापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह, निमगाव केतकी रुग्णालय, भिगवण रुग्णालय येथे (दि.23) पासून सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात कोणत्याही रुग्णांची हेळसांड अडचण होणार नाही.