नवी दिल्ली – नॉव्हेलकरोनाव्हायरसमुळे पसरत असलेल्या कोव्हिड19 च्या रुग्णांवर उपचारांसाठी पुढे सरसावलेला एक सामाजिक कार्यकर्ता अर्थात “कोव्हिड वॉरियर’ने जननिंदा, लोकांची टीका आणि सततच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्त्या केल्याचे उघड झाल्याने दिल्ली आरोग्य प्रशासन हादरले आहे.
“कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान मी रुग्णांची आणि बाधितांची बरीच सेवा केली. लोकांची मदत केली. मात्र अनेक लोकांनी मला सातत्याने तुच्छ लेखलं आणि टोमणे आणि टीकेचाही सामना करावा लागला. जे दुसऱ्याला खालच्या पातळीचे समजतात त्यांना देव सुखी ठेवो…’ अशी “सुसाईड नोट लिहून या “करोना वॉरियरने’ आपलं प्राणार्पण केल्याने, अशा कार्यकर्त्यांना समाजाने वाळीत न टाकता, त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे, ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॉरियर’ला निराशेने ग्रासले होते. त्यातूनच त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. लॉकडाऊनमध्ये केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं तर नाहीच; उलट लोकांच्या टीकेंचा सामना करावा लागला. “तुलाच आता करोना झाला नसेल, कशावरुन?’ अशा प्रश्नांनी त्याला अनेकांनी भंडावून सोडले होते. म्हणूनच त्याने आत्महत्या केली असावी. या प्रकरणी मिळालेल्या माहिती आणि सुसाईड नोटवरून तपास सुरू आहे.
देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या संकटात लोकांच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कुटुंबीयांपासून दूर राहून अनेकजण मदतीचा हात देत आहे. महामारीच्या काळात “कोरोना वॉरियर’ सदैव तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. मात्र या घटनेने “करोना वॉरियर’ आणि समाज यामधील एक न दिसणारी दरी अधोरेखित झाली आहे