मावळ – करोना महामारीची तिसरी लाट सध्या “सक्रिय’ आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील गड-किल्ल्यांसह पर्यटनाला पुन्हा “ब्रेक’ लागला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले व स्मारक, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी मंगळवारपासून (दि. 11) कलम 144 लागू करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी नागरिक व पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. या ठिकाणी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
या पर्यटनाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले असतात. या खाद्य पदार्थ विक्री स्टॉलवार पर्यटक विनामास्क, सामाजिक अंतराचे पालन न करता गर्दी करतात. त्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतराचे पालन आदी कोविड नियमांचे पालन होताना दिसत नाही.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना विषाणुचा प्रसार ओमिक्रॉन व्हेरियंटसह मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्या प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून 10 जानेवारी मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. करोना विषाणूचा व ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
प्रतिबंधित केलेली क्षेत्रे पुढीलप्रमाणे –
मावळ : भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट, मंकी पॉईंट, अमृतांजन ब्रीज, वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉईंट, लायन पॉईंट, शिवलिंग पॉईंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर आदी.
मुळशी :लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉईंट, सहारा सिटी, कोळवण परिसर.
हवेली :घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर आदी.
आंबेगाव :डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ.
जुन्नर :शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र आदी.
भोर :रोहडेश्वर/विचित्र गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड इत्यादी.
वेल्हा :तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर इत्यादी.
वरील नमूद केलेल्या ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणांच्या सभोवताली 1 किलोमीटर परीसरात पुढील आदेश येईपर्यंत खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.
किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. – वरील प्रतिबंधीत केलेल्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्यविक्री करणे व उघडयावर मद्यसेवन करणे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन “ओव्हरटेक” करणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिक साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.
सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे. सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे. या कृतीमुळे ध्वनी, वायू व जलप्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करणे.
या आदेश पोलीस, शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी, डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू राहणार नाहीत. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असा इशारा देण्यात आला.
=========================