किंगस्टन: 20 करोनामुळे जगभर सध्या जे लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे जगातील कार्बन उर्त्सजनाचे प्रमाण तब्बल 17 टक्क्यांनी घटले आहे. एका पाहणीत हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या प्रकारामुळे वातावरणातील बदलाला काहीं अंशी पायबंद घालता आला आले आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाने करोनाच्या काळातील कार्बन उत्सर्जनाच्या नोंदी घेतल्या. त्यानुसार वायु प्रदुषणाच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 ते 7 टक्के इतकी घट अपेक्षित आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनातही बऱ्याचअंशी घट झाली आहे. लॉकडाऊनचे निर्बंध वर्षभर कायम राहिले तर प्रदूषणाची पातळी 7 टक्के इतकी घटेल आणि हे लॉकडाऊन लवकर उठवले गेले तर ही घट 4 टक्के इतकी असेल असे त्यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनच्या एक आठवड्याच्या काळात अमेरिकेतील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण एक तृतीयांशाने घटले आहे. चीन हा जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात चीनचे कार्बन उत्सर्जन 25 टक्क्यांनी घटले आहे. तर भारताचे कार्बन उत्सर्जन 26 टक्क्यांनी आणि युरोपिय देशांचे उर्त्सजन 27 टक्क्यांनी घटले आहे.
4 एप्रिल ते 9 एप्रिल या काळात कार्बन उत्सर्जनातील सर्वाधिक घट नोंदवली गेली आहे. त्याकाळात जगातील कार्बन उत्सर्जन 18.7 दशलक्ष टनाने घटले आहे असे या पहाणीतून आढळून आले आहे. तथापि असे असले तरी कार्बन उत्सर्जनाचे हे प्रमाण एकूण प्रदुषणाच्या मानाने अत्यंत अल्प आहे. पुढील वर्षी पुन्हा हे प्रमाण वाढतेच असणार आहे त्यामुळे सध्या कमी झालेल्या प्रदूषाणाचा फार विधायक परिणाम अपेक्षित धरता येत नाही असेही ही पहाणी करणाऱ्यांचे म्हणणे आहे.