पुणे -डोळ्यात देशसेवेची स्वप्ने घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण… येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे पेलण्याचा आत्मविश्वास… लष्करी बॅंड पथकाच्या कदम कदम बढाये जा… विजय भारत… सारे जहॉं से अच्छा या गाण्यांच्या तालावर शिस्तबद्ध संचलन अशा दिमाखदार वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 143 व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साही वातावरणात बुधवारी गुलाबी थंडीत प्रबोधिनीच्या खेत्रपाल परेड मैदानावर जल्लोषात पार पडला.
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील “अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला. या संचलनाला चेतक हेलिकॉप्टर, सूर्यकिरण या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी हे सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील “क्वाटर डेक’चा उघडलेला दरवाजा आणि या दरवाजातून विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बॅण्डचे झालेले आगमन, त्या पाठोपाठ प्रबोधिनीच्या छात्रांच्या मैदानावर झालेल्या प्रवेशामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारा आणणारा प्रसंग होता. भारताचे नैदल प्रमुख आर. हरी कुमार यांनी या दीक्षान्त संचलनाची मानवंदना स्वीकारली. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख संजिव डोगरा, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर उपस्थित होते.
यावर्षी 250 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. मित्र राष्ट्राचे कॅडेट्सनी देखील यात सहभाग घेतला होता. एक वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी वायुदल, नैदल आणि भूदल यामध्ये सहभागी होतील.
“सूर्यकिरण’चा थरार
दीक्षान्त संचलन सोहण्यात सूर्यकिरण या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पथकाने आकाशात विविध कसरती करत उपस्थितांची मने जिंकली.
गौरव यादवला सुवर्णपदक
यावर्षी राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी गौरव यादव ठरला. तो तिन्ही वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणारा विद्यार्थी ठरला. तर सौरभ शर्मा हा विद्यार्थी राष्ट्रपती रौप्य पदकाचा मानकरी ठरला. तर विवेक महला हा राष्ट्रपती कांस्य पदकाचा मानकरी ठरला.