अफगाणिस्तानातील शांतता विषयावर पुन्हा चर्चा सुरू

दोहा – अफगाणिस्तानात तालिबानी गनिम आणि सरकारी फौजांमध्ये जो गेली अनेक वर्षे संघर्ष सुरू आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी खंडीत झालेली चर्चेची प्रक्रिया दोहा येथे पुन्हा सुरू झाली आहे. यात शस्त्रसंधी आणि महिला विषयक हक्कांच्या संबंधात प्रामुख्याने चर्चा होऊन काहीं ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. या चर्चेसाठी तेथे तालिबानच्या नेत्यांसह सुमारे बारा अफगाणि नेतेही सहभागी झाले आहेत.

ही चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी समाधान व्यक्‍त केले असून त्याबद्दल त्यांनी अफगाणिस्तानातील सिव्हील सोसायटी, महिला, तेथील सरकार आणि तालिबान्यांचे कौतुक केले आहे. अफगाणिस्तानात येत्या सप्टेंबर मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यापुर्वी तेथे राजकीय तोडगा निघाला पाहिजे यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. जर्मनी आणि कतारच्या मध्यस्थीने ही चर्चा सुरू असून दोन दिवस चालणाऱ्या या चर्चेसाठी 70 शिष्टमंडळे तेथे दाखल झाली आहेत. यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी आपसातील मतभेद दूर केले आणि त्यांनी शांततेचा करार केला तर ती एक ऐतिहासिक घटना ठरेल असे जर्मनीने म्हटले आहे.

रविवार पासून ही चर्चा सुरू झाली. आज या चर्चेचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेत सर्वांनीच शस्त्रंसधी झाली पाहिजे या प्रस्तावावर जोर दिला आहे. या चर्चेनंतर अमेरिका आणि तालिबान यांच्यात थेट चर्चा होणार आहे. आमच्यातील ही थेट चर्चा अधिक परिणामकारक ठरेल असा विश्‍वास अमेरिकेचे मध्यस्थ झाल्मे खलिलजाद यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.