नटराज कला मंडळाचा उपक्रम : अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
बारामती- बारामती शहर व तालुक्यात करोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला असताना येथील नटराज नाट्य कला मंडळाने सामाजिक बांधिलकीचा वसा जपला आहे. मंडळाने आता लोकसहभागातून दुसऱ्या कोविड केअर सेंटरची निर्मिती करून बारामतीकरांना एक हात मदतीचा दिला आहे. त्यामुळे महामारीत नटराज मंडळाचे समाजभान इतरांना आदर्शवत ठरले आहे.
करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांच्यासह बारामतीतील काही संस्था देखील कार्यरत आहेत. नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीने
शहरातील इंदापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात सुरू केलेले 100 खाटांच्या क्षमतेचे लोकसहभागातील पहिले कोविड केअर सुरू केले. चार दिवसांतच हे कोविड केअर सेंटर रुग्णांनी भरून गेले. सेंटरची वाढती गरज लक्षात घेऊन नटराजने मंडळाने दुसऱ्या कोविड केअर सेंटरची उभारणी सुरू केली आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या जवळील तारांगण शासकीय महिला वसतिगृहात कोविड सेंटर उभारले जात आहे. 100 खाटांची क्षमता असलेल्या सेंटरमध्ये लक्षणे नसलेले पण करोना पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात येणार आहेत. 14 दिवस रुग्णांवर उपचार होतील. त्यानंतर रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणेला कोविड सेंटर चालविण्यासाठी लोकसहभागातून मदत करणे, असा उद्देश आहे. सेंटरचे व्यवस्थापन नटराज नाट्य कला मंडळ पाहणार आहे. वैद्यकीय उपचार, तपासणी, रुग्ण दाखल करणे या बाबी आरोग्य विभागाकडून केल्या जाणार आहेत. नटराजचे कार्यकर्ते जेवण, चहा, नाष्टा, करमणुकीची सोय व रुग्णांना इतर सुविधांचे नियोजन करतील. असे नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.
- बारामती शहर व तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. वाढते रुग्ण पाहता कोविड केअर सेंटर निर्माण होणे गरजेचे आहे. रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे नटराज मंडळाच्या वतीने पहिले कोविड केअर सेंटर उभारले. वाढती गरज लक्षात घेऊन दुसरे कोविड केअर सेंटर उभारणीचा निर्णय घेतला. सेंटर उभारणीसाठी इतर संस्थांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे.
– किरण गुजर, अध्यक्ष, नटराज नाट्य कला मंडळ.