शेतकरी नेत्यांची हत्या करून वातावरण बिघडवण्याचा कट ? – गुप्तचर विभागाचा अहवाल

पंजाब आणि हरियाणातील संमिश्र स्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली – कृषी कायद्यांना विरोध करण्याच्या निमित्ताने शेतकरी आंदोलनाला हवा देणारे खलिस्तान समर्थक आता आंदोलकांच्या जीवावर स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर यंत्रणेने केंद्र सरकारला या संदर्भात अहवाल दिला आहे. हा अहवाल मिळाल्यापासून दिल्ली पोलीस ‘अलर्ट’ आहेत. दिल्लीतून शेतकरी आंदोलनाच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येकाच्या हालचालींची बारकाईने नोंद घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे.

केंद्र सरकार नव्या कृषी कायद्यांविषयी शेतकऱ्यांना असणारे आक्षेप जाणून घेण्यास तयार आहे. त्याकरता चर्चेच्या काही फेऱ्या झाल्यानंतरही कोंडी फुटलेली नाही. कायद्यांना 18 महिने स्थगिती देण्याची तयारीही सरकारने दर्शवली आहे. पण शेतकऱ्यांनी एकही आक्षेप न सांगता आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाची कोंडी झाल्याचे चित्र आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेनंतर आंदोलनाला असलेली सहानुभूती कमी झाली होती.

आंदोलनस्थळी असलेली गर्दी कमी झाली. मात्र अजुनही वातावरण पूर्णपणे निवळेले नाही. तरीही आंदोलनाची सुरूवातीच्या टप्प्यात जी धार होती, ती कमी झाली आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून भारत सरकार विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी खलिस्तान समर्थक नव्याने हिंसेचा पर्याय स्वीकारण्याच्या तयारीत आहेत असा गुप्तचरांचा अहवाल सांगतो आहे.

ज्या शेतकरी नेत्यांना कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी पुढे केले त्यातल्याच एक-दोन नेत्यांची भर रस्त्यावर हत्या करण्याचा खलिस्तान समर्थकांचा डाव आहे. यासाठी खलिस्तान समर्थक वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत. शेतकरी नेत्यांना मारले तर त्या नेत्यांच्या अनुयायांच्या संतापाचा कडेलोट होईल. भारत सरकार विरोधात वातावरण तापवणे शक्‍य होईल, या विचारातून एक-दोन शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा विचार खलिस्तान समर्थक करत आहेत.

दिल्ली पोलीस सतर्क
गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यामुळे दिल्ली पोलीस विशेष दक्षता घेत आहेत. मात्र पंजाब किंवा हरियाणामार्गे आंदोलनस्थळी दाखल होऊन खलिस्तान समर्थक घातपात करण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात ठेवून दिल्ली पोलिसांनी शेजारी राज्यांच्या पोलिसांना धोक्‍याची सूचना दिली आहे. मात्र पंजाब आणि हरयाणातील वातावरण संमिश्र आहे.

काही नागरिक शेतकरी आंदोलनाला समर्थन देत आहेत तर काही जणांनी शेतकरी आंदोलन थांबणे आवश्‍यक असल्याची भूमिका घेतली आहे. या संमिश्र वातावरणामुळे पंजाब किंवा हरियाणामार्गे खलिस्तान समर्थक आंदोलनास्थळी पोहचून प्रमुख शेतकरी नेत्यांना ठार करण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.