महिला आरोपीने थाटले न्यायाधीशासोबतच लग्न; लाचेप्रकरणी आहे तुरूंगात

नवी दिल्ली – एका महिला आरोपीने चक्क एका न्यायाधीशासोबतच लग्न केल्याची घटना घडली आहे. लाचखोरीच्या आरोपात राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या पिंकी मीना यांना अटक झाली होती. महामार्गाची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पण 10 दिवसांच्या अंतरिम जामिनावर असताना मंगळवारी त्यांचा विवाह झाला. विशेष म्हणजे, पिंकी यांचे पती न्यायाधीश असल्यामुळे सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा राजस्थानात रंगली आहे.

पहिल्याच प्रयत्नात पिंकी मीना या आरएएस अर्थात राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. तर,पिंकी मीना यांचे पती नरेंद्र दौसा हे असून राजस्थान ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये निवड झाल्यापासून त्यांचे सध्या जयपूरमध्ये प्रशिक्षण सुरू आहे.

पिंकी मीना यांच्यावर मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्या जवळपास महिन्याभरापासून याप्रकरणी तुरूंगात होत्या. पिंकी मीना यांनी लग्नासाठी राजस्थान उच्च न्यायालयाकडे जामिन मागितला होता, त्यावर न्यायालयाने त्यांना 10 दिवसांचा अंतरिम जामिन मंजूर केला होता. त्यांचा जामिनाचा कालावधी 21 फेब्रुवारी रोजी संपणार असल्यामुळे 21 तारखेला मिना पुन्हा आत्मसमर्पण करतील.

मिना या राजस्थानमधील बांदीकुईच्या उपविभागीय दंडाधिकारी म्हणून जानेवारी महिन्यापर्यंत कार्यरत होत्या. न्यायाधीशासोबत लग्न केल्यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो, असे म्हणत सरकारी वकिलांनी मिना यांच्या जामिनाला विरोध केला होता. पण, अखेर न्यायालयाने मिना यांना जामिन मंजूर केला. आता लग्न झाल्यानंतर मीना या पुन्हा आत्मसमर्पण करतील, त्यानंतर या प्रकरणी पुढची सुनावणी होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.