नवी दिल्ली – व्होडाफोन आयडिया कंपनीने विशिष्ट ग्राहकांना 4जी सेवा प्राधान्यक्रमाने देण्याचा प्लॅन सुरू केला आहे. मात्र, या प्लॅनच्या अंमलबजावणीला दूरसंचार नियामक अधिकारिणी म्हणजे ट्रायने स्थगिती दिली होती. आता ट्रायच्या निर्णयाला दूरसंचार क्षेत्रातील लवादाने रोखले आहे.
ट्रायने दिलेला निर्णय हा अंतरिम स्थगिती आहे. या विषयावर तपशिलात सुनावणी घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे लवादाने सांगितले आहे. दरम्यानच्या काळात ट्रायने दिलेली अंतरिम स्थगिती कार्यरत राहणार नाही, असे लवादाने म्हटले आहे.
व्होडाफोनने काही ग्राहकांसाठी प्राधान्यक्रमाचा प्लॅन जाहीर केला आहे. त्यामुळे इतर ग्राहकांना वेगवान सेवा मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे का, असे ट्रायने या कंपन्यांना विचारले आहे. या कंपन्यांकडून आलेल्या उत्तरानंतर ट्राय अंतिम निर्णय घेणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये या प्लॅनची अंमलबजावणी करू नका, असे ट्रायने सांगितले होते.
ट्रायच्या या सूचनेला व्होडाफोन कंपनीने लवादाकडे म्हणजे टीडीसॅटकडे आव्हान दिले होते. आता ट्रायने यासंदर्भात अंतिम निर्णय घेतल्यानंतर कंपनी आपली पुढील भूमिका ठरविण्याची शक्यता आहे. एअरटेलच्या अशाच प्रकारच्या प्लॅनला ट्रायने स्थगिती दिलेली आहे.