नियमांचे उल्लंघन केल्याने दुकानच सील

नारायणगाव -चिकनची विक्री करत असताना त्यांच्या आरोग्याची कोणतीही काळजी न घेता व पाचपेक्षा अधिक लोकांना दुकानातील चिकनची विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. दुकान 14 दिवसांकरिता सील करण्यात आल्याची नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली. दरम्यान कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे उल्लंघन करणाऱ्याचे दुकान सील करण्याची पुणे जिल्ह्यातील पहिली पोलीस कारवाई ठरली आहे.
इम्रान कासम मोमीन (वय 37, रा. नारायणगाव)असे या दुकानदाराचे नाव आहे. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुरेश देवराम गेंगजे यांनी दिली. शुक्रवारी (दि. 17) दुपारी दोनच्या सुमारास नारायणगाव-जुन्नर रोड येथे इम्रान कासम मोमीन हा त्याचे महाराष्ट्र चिकन सेंटर दुकानामध्ये मास्क न लावता व पाचपेक्षा अधिक लोकांना दुकानातील चिकनची विक्री करत होता.
आरोग्याची कोणतीही काळजी न घेता व सॅनिटायझर व हातपाय धुण्याचे व्यवस्था केली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्याला उपाययोजनेबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मोमीन याने नियमांचा भंग केल्याने त्याचे दुकान 14 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. दुकान सील करण्याची पुणे जिल्ह्यातील व जुन्नर तालुक्यातील पहिलीच पोलीस कारवाई आहे.
जे व्यावसायिक नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करून दुकाने 14 दिवसांकरिता सील करण्यात येईल, असा इशारा सहाय निरीक्षक अर्जुन घोडे यांनी दिला आहे.





