बारामतीत गरजूंना “शिवभोजन’चा लाभ

जळोची- रोजंदारी व हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब गरजू नागरिकांना लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळी वरदान ठरत आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसणाऱ्या बारामतीतील शेकडो गरजू नागरिकांना शिवभोजन थाळी वरदान ठरत आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून 76 हजार 926 नागरिकांनी लाभ घेतला आहे.
राज्यातील कोणताही गोरगरीब गरजू नागरिक उपाशी राहणार नाही. या संकल्पनेतून राज्य शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे. बारामतीतील रोजंदारी, हातावरचे पोट असणाऱ्या गरजू नागरिकांचा विचार करून बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी उत्पन्न उपबाजार जळोची, बारामती तालुका दूध संघ, न्यू अक्षदा मंगल कार्यालय, पान गल्ली, बारामती तालुका खरेदी- विक्री संघ तांदुळवाडी, शाळा क्रमांक 2, रयत भवन, माता रमाई भवन, सिद्धार्थनगर, अनंत आशा नगर आदी दहा ठिकाणी ही योजना राबविली जात आहे. ती गरजूंसाठी वरदान ठरत आहे.





