नाशिक – आरोग्य विज्ञान विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा लवकरच प्रारंभ होणार आहे. आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांचा समावेश असलेल्या ‘इंटीग्रेटेड मेडिकल कॉम्प्लेक्स’ चा समावेश यात करण्यात यावा. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पुढील वर्षी विद्यापीठ स्थापनेचा रौप्य महोत्सव हा विलक्षण योग जुळून येत असल्याचे विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षान्त समारंभ कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षेतखाली झाला. या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रीअमित देशमुख तसेच सन्माननीय अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा.डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते. यावेळी शिक्षणमंत्री अमित देशमुख बोलत होते.
युक्रेनमधील युद्धामुळे परदेशात अडकलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याकरिता राज्य शासन व पंतप्रधान यांच्याशी राज्यपालांमार्फत चर्चा करण्यात येईल. परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा- मंत्री @AmitV_Deshmukh pic.twitter.com/ge9gRB15mG
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 2, 2022
शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले की, सध्या रशिया व युक्रेन या देशांतील युध्दामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सहाय्य करण्यासाठी राज्य शासन व पंतप्रधान यांच्याशी राज्यपाल यांच्यामार्फत चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात विद्यापीठाने पुढाकार घ्यावा व परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी संशोधनपर अहवाल सादर करावा. विद्यापीठाने कुलगुरु यांच्या निर्देशानुसार ‘व्हिजन डॉक्युमेंट’ उपक्रम अंतर्गत कार्य करावे. ज्ञान हे बदलासाठी शक्तीशाली साधन आहे. समाजाच्या विकास व कल्याणासाठी ज्ञानाची निर्मिती व उपयोजन महत्वपूर्ण आहे. राष्ट्र बांधणीच्या प्रक्रियेत आरोग्य क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड-19 च्या काळात आरोग्य विद्यापीठाने उल्लेखनीय काम केले याबद्दल मला अभिमान आहे. या परिस्थितीत ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला आहे.
– भगत सिंह कोश्यारी (राज्यपाल)
डॉक्टर हा समाजव्यवस्थेचा आदरणीय घटक आहे. आरोग्यसेवा क्षेत्रात डॉक्टरांचे कार्य उल्लेखनीय आहे. प्रत्येकाच्या जीवनात किंबहुना प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंगात डॉक्टर सहभागी असतात. समाजाचा आनंद व कल्याण जोपासण्याचे सेवाभावी कर्तव्य सर्वांनी करावे असे शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.