येत्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता
पुणे – परदेश, देशांतर्गत बाजारपेठांमधून कमी होत असलेली आवक, तसेच इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या वाहतुकीचा खर्चाचा फटका डाळींना बसला आहे. रोजच्या दैनंदिन वापरातील डाळींच्या किमतीत मागील काही दिवसांत क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या काळात हे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज मार्केट यार्डातील डाळींचे व्यापारी विजय राठोड यांनी वर्तविला आहे.
मार्केट यार्डातील भुसार विभागात मुख्यत: मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. तसेच, डीझेलच्या दरात मागील महिन्याभरात सुमारे 10 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम दळणवळणावर झाल्याने उडीद डाळ आणि मटकी डाळ तसेच मटकीच्या भावात वाढ झाली आहे.
तर सध्या स्थिर असलेल्या मूगडाळ, तूरडाळ, हरभरा डाळींच्या भावातदेखील वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. मटकी आणि मटकी डाळींची आवक कमी झाली आहे. पुण्याच्या बाजारात मागणी खूप आहे. मात्र, अपेक्षित पुरवठा होत नसल्याने भाव वाढले आहेत. सध्या मटकी 115 ते 125 रुपये किलोचा भाव आहे, तर मटकी डाळीचा भाव 125 ते 135 रुपये झाला आहे.