बेंगळुरू – कर्नाटकात कॉंग्रेस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाच जणांनी कॉंग्रेस कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत व्यक्ती हा स्थानिक कॉंग्रेस नेत्याचा समर्थक होता.
घटना बेंगळुरूच्या चौंडेश्वरी नगर भागातील आहे. रवी असे मृताचे नाव आहे. बेंगळुरूमधील नंदिनी लेआउट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपास पथक तयार केले आहे.
पाच जणांनी मिळून रवीची हत्या केली. पाचही आरोपी मोटारसायकलवरून आले होते आणि त्यांनी रवीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
पोलिसांनी सांगितले की, कॉंग्रेसचे स्थानिक नेते कृष्णमूर्ती यांचा वाढदिवस होता. मृत रवी हा कॉंग्रेस नेते कृष्णमूर्ती यांचा समर्थक होता आणि त्याने आपल्या नेत्याला शुभेच्छा देणारे होर्डिंग लावले होते. मारेकऱ्यांनी आधी ते होर्डिंग फाडले आणि नंतर रवीची हत्या केली.