कराड – बाबरमाची (सदाशिवगड), ता. कराड येथे शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी विजेच्या धक्क्याने तुकाराम सदाशिव खोचरे (वय 55) व शहाजी सदाशिव खोचरे (वय 50) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. विहिरीजवळ असलेल्या फ्यूज बॉक्समुळे त्यांना विजेचा धक्का बसला. घटनास्थळी रात्री उशिरा पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बाबरमाची-सदाशिवगड येथील भटकी नावाच्या शिवारात तुकाराम आणि शहाजी खोचरे यांचे शेत आहे. शेतातील विहिरीला फ्यूज बॉक्समधून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. शेतात काम करण्यासाठी हे दोघे शुक्रवारी (दि. 24) दुपारी 12.30 च्या सुमारास घरातून गेले. ते दिवसभर घरी परतले नाहीत.
त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सायंकाळी 5 च्या सुमारास तुकाराम खोचरे यांचा मुलगा शेतात गेला. त्यावेळी तुकाराम व शहाजी हे विहिरीपासून काही अंतरावरील फ्यूज बॉक्सजवळ मृतावस्थेत पडल्याचे दिसले. मुलाने या घटनेची माहिती दिल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. एन. पाटील, पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी महावितरणचे अधिकारी व कर्मचारीही तेथे पोहोचले होते. त्यांनी भागातील वीजपुरवठा तातडीने खंडित केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले.