थिरूवनंतपूरम :- केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे पुत्र चंडी ओमन यांना कॉंग्रेसने विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात केरळमधील सत्तारूढ आघाडी उमेदवार देणार का याविषयी उत्सुकता आहे.
दिग्गज नेते अशी ख्याती मिळवलेल्या चंडी यांचे मागील महिन्यात निधन झाले. त्यामुळे ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेली पुथुपल्ली ही जागा रिक्त झाली. चंडी यांनी तब्बल 53 वर्षे त्या मतदारसंघावर वर्चस्व राखले. त्यांच्यामुळेच त्या मतदारसंघाकडे कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते.
निवडणूक आयोगाने मंगळवारी त्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर काही तासांतच कॉंग्रेसने चंडीपुत्राच्या उमेदवारीची घोषणा केली. ती बाब पुथुपल्ली मतदारसंघातील चंडी यांचा प्रभाव अधोरेखित करणारी आहे. त्या मतदारसंघात 5 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. मतमोजणी 8 सप्टेंबरला केली जाणार आहे.
चंडी यांच्या मुलाला पोटनिवडणुकीत सहानुभूतीचा फायदा होण्याचे निश्चित मानले जात आहे. मात्र, सत्तारूढ डावी आघाडी तूर्त तरी ते मान्य करण्यास तयार नाही. त्यातून पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय त्या आघाडीने घेतला आहे.