भोपाळ – ऐन निवडणूक हंगामात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलेल्या एका ट्विटमुळे कॉंग्रेस पक्ष संतप्त झाला. त्या ट्विटमधून हात पूर्ण साफ करण्याच्या आशयाचे आवाहन चौहान यांनी केले. त्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेसने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.
बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्याशिवाय, मध्यप्रदेश आणि इतर काही राज्यांतील पोटनिवडणुकांची घोषणाही लवकरच होणे अपेक्षित आहे. त्याचा संदर्भ देऊन चौहान यांनी जनतेला आवाहन करणारे एक ट्विट केले. मेरे प्यारे दोस्तों, मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक सहित देश भर में कई जगहों पर चुनाव होने वाले हैं. हमें करोना काल को देखते हुए चुनाव आयोग के दिशानिर्देशों का पुरा ध्यान रखना हैं. हाथ पुरी तरह सॅनिटाईज कर साफ कर देना हैं, असे त्यांनी म्हटले.
हाताचा पंजा हे कॉंग्रेसचे चिन्ह आहे. साहजिकच, चौहान यांनी सूचक ट्विट करून अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसला लक्ष्य केल्याचे चर्चा सुरू झाली. प्रदेश कॉंग्रेसने हाथ, सॅनिटाईज आणि साफ या शब्दांवर आक्षेप घेत मध्यप्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली.
चौहान यांच्या शब्दप्रयोगामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.