श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे परमशिष्य, प्रवचनकार आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि लेखक केशव विष्णू बेलसरे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म सिकंदराबाद (आंध्र प्रदेश) येथे 8 फेब्रुवारी 1909 रोजी एका मराठी कुटुंबात झाला.
त्यांचे आई-वडील सुशिक्षित परंतु धार्मिक वळणाचे होते. त्यांचे वडील डिस्ट्रिक्ट कोर्टात न्यायाधीश होते. वडिलांच्या ग्रंथसंपदेमध्ये असलेली सर्व पुस्तके लहानपणीच त्यांनी वाचून काढली होती. लहानपणापासून श्रीमद्भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वरी, दासबोध अशा ग्रंथांची त्यांना ओढ होती. त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती.गीतेचे 700 श्लोक त्यांनी एका आठवड्यात पाठ केले होते. बालपण हैद्राबादमध्ये गेल्यामुळे त्यांना उर्दू उत्तम येत असे. ते उर्दू शायरी व त्यांत त्यांना मिर्झा गालिब, मीर व जौक हे कवी अधिक आवडत असत.
घरातील परिस्थिती, सामाजिक उलाढाली, निजामशाहीचे वातावरण आणि सर्वांत मुख्य म्हणजे देशभरात पेटलेले स्वातंत्र्यचळवळीचे लोण यांमुळे त्यांच्या मनावर परिणाम झाले. क्रांतिकारक कारवायांमध्ये ते सहभागी झाले. परंतु त्यांची तब्येत बिघडली आणि मन अस्वस्थ झाले आणि नकारात्मक विचारांचा त्रास होऊ लागला, तेव्हा दासबोधातील “जेही उदंड कष्ट केले। तेची भाग्य भोगून गेले।’ या ओवीने त्यांचे मनपरिवर्तन झाले. भरपूर अभ्यास करून ज्ञानार्जन करावे, असे त्यांनी ठरविले. पुन्हा आपली एकाग्रता परत मिळवली. त्यांनी विज्ञान विषय सोडून तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास करायचा निर्णय घेतला व मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
तत्त्वज्ञान हा विषय त्यांना आवडला आणि त्याचा सखोल अभ्यास केला. तो पूर्णपणे आत्मसात करून त्यावर चिंतन व पुनर्विचार करीत. त्यांचे विचार मुळातच शुद्ध आणि तर्काला धरून असायचे. त्यांना विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारी गोष्ट स्वाभाविकच पटत असे. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत असताना पडणाऱ्या विविध प्रश्नांची ठोस उत्तरे मिळविण्यासाठी त्यांनी तत्त्वज्ञानाबरोबरच तर्कशास्त्र, मानसशास्त्र, शरीरशास्त्र, समाजशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल, काव्य, नाट्य, विनोद व अशा अनेक विषयांचा अभ्यास केला. भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून दोघांमधील साधर्म्य तसेच विसंगती या दोन्ही बाजूंचा सखोल अभ्यास केला. 10 वर्षे दादरच्या बालमोहन विद्यालयात मॅट्रिकच्या वर्गाला इंग्रजी शिकवित असत. त्यानंतर प्रथम खालसा महाविद्यालयामध्ये व नंतर सिद्धार्थ महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले.
त्यांची व गोंदवलेकर महाराजांची पहिली भेट 1931 मध्ये झाली. महाराजांनी सध्या काय करतोस? असे विचारल्यावर ते म्हणाले ज्ञानेश्वरी वाचतो. त्यावर श्रीमहाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्यास सांगितले. त्या दिवसापासून आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांच्या ओघवत्या व सुस्पस्ष्ट वाणीमधून अध्यात्म व तत्त्वज्ञानाची सांगड घालून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी “आनंदसाधना’ या आत्मचरित्रात साधनेतील अडचणी, विविध टप्पे, अनुभव आणि एकूण साधनप्रवास यांचे विवेचन सर्वसामान्य साधकांसाठी सांगितले आहे.
त्यांनी 50 पेक्षा अधिक पुस्तकांतून परमार्थाची कल्पना समजावून सांगितली आहे. त्यातील उपनिषदांचा अभ्यास, चैतन्यसुधा, समाधान पर्व, भावार्थ भागवत, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय, संतांचे आत्मचरित्र, साधकांसाठी संतकथा ही त्यांची प्रमुख पुस्तके आहे. 3 जानेवारी 1998 रोजी ते प्रसन्नचित्ताने मृत्यूला सामोरे गेले.