नेवासा – नेवासा शहरामध्ये करोनाबधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत 14 दिवसासाठी नेवासा शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून घोषित केले होते. त्यानंतर अत्यावश्यक सेवा, बॅंका बंद केल्या होत्या. या कालावधीत पुन्हा नवीन करोनाबाधित रुग्ण न आढळल्याने सोमवार (दि.27) पासून अत्यावश्यक सेवा, बॅंका सुरू होतील. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी म्हटले आहे.
तब्बल चौदा दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अत्यावश्यक सेवा, बॅंका सुरू होणार असल्याने नेवासा शहरवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. दि. 13 एप्रिल रोजी करोनाबाधित तिसरा रुग्ण आढळला होता. त्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत सुरुवातीला 13 एप्रिल ते 18 एप्रिल असे पाच दिवस व नंतर 18 एप्रिल ते 27 एप्रिल असे नऊ दिवसासाठी वाढ करून चौदा दिवसासाठी शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करत दवाखाने, बॅंका, किराणा दुकाने, मेडिकल, भाजीपाला मार्केटसह सर्व अत्यावश्यक सेवा बंद केल्या होत्या.
संचारबंदीमुळे नागरिकांना सर्व सेवा शासनामार्फत घरपोहच पुरविल्या जात होत्या. चौदा दिवसांच्या कालावधी मध्ये नवीन कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने सोमवार दि.27 एप्रिल सकाळी 6 वाजतापासून केंद्र सरकारच्या लॉकडाऊनच्या अटींचे पालन करत जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुर्ववत सूरु होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तीन मेपर्यंत केंद्राच्या आदेशाप्रमाणे लॉकडाऊन चालूच रहाणार आहे. यामध्ये नागरिकांनी व व्यवसायिकांनी बाजारपेठेत अथवा गावांमध्ये सोशल डिस्टन्स पाळून व्यवहार करावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.