न्यूयॉर्क :- अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अमेरिकेच्या कोको गॉफने तीन सेटचा चुरशीचा सामना जिंकून चौथ्या फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकित गॉफने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत, शेवटचे 10 गेम जिंकून 32व्या मानांकित एलिस मर्टेन्सचा 3-6, 6-3, 6-0 असा पराभव केला.
गेल्या वर्षी यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या गॉफला अंतिम आठमध्ये प्रवेश करण्यासाठी 33 वर्षीय कॅरोलिन वोझ्नियाकीचे खडतर आव्हान पार करावे लागेल.
दुसरीकडे, चौथ्या मानांकित एलेना रायबाकिनाचे(Kazakhstan)या स्पर्धेतील आव्हान पराभवामुळे संपुष्टात आले. तिला सोरेना क्रिस्टियाने तीन सेटच्या लढतीत 6-3, 6-7(6), 6-4 ने पराभूत केले. क्रिस्टियाने पहिल्यांदाच यूएस ओपनची चौथी फेरी गाठली आहे. तिचा पुढील सामना 15व्या मानांकित बेलिंडा बेन्सिकशी होणार आहे.
जोकोविचचा शानदार विजय…
सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पहिले दोन सेट हरल्यानंतरही तो पाचव्या सेटपर्यंत सामन्यात पुनरागमन करून विजय मिळवू शकतो हे शनिवारी सिद्ध करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मजबूत संदेश दिला.
साडेतीन तास चाललेल्या या लढतीत जोकोविचने देशवासीय लास्लो गेरेचा 4-6, 4-6, 6-1, 6-1, 6-3 असा पराभव केला. जोकोविचचा पुढील सामना पहिल्यांदाचा यूएस ओपन खेळणाऱ्या क्रोएशियाच्या 25 वर्षीय बोर्ना गोजोशी होणार आहे.