नवी दिल्ली – मेरठमध्ये, दिल्ली-मेरठ महामार्गावरून जाणाऱ्या कावड यात्रेचे स्वागत युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवभक्तांवर पुष्पवृष्टी केली. सहारनपूरनंतर मुख्यमंत्री योगी थेट दिल्ली-मेरठ महामार्गावर पोहोचले, जिथे त्यांनी हजारो शिवभक्तांवर दोन्ही हातांनी पुष्पवृष्टी केली.
महामार्गावर मुख्यमंत्र्यांसाठी खास बनवण्यात आलेल्या व्यासपीठावरून त्यांनी पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्र्यांचा उत्साह पाहून अनेक यात्रेकरूंनी त्यांचे आभार देखील मानले. यावेळी शिवभक्तांकडून योगी-योगी, हर हर महादेव, जय भोलेच्या घोषणाही देण्यात आल्या. मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत जल ऊर्जा मंत्री स्वतंत्र देव सिंह आणि गृह सचिव संजय प्रसाद हेही उपस्थित होते.
उत्तर प्रदेशात योगी सरकार सत्तेवर आल्यापासून दरवर्षी या यात्रेदरम्यान भक्तांवर फुलांचा वर्षाव केला जातो. काही दिवसांपूर्वी वाराणसीमध्येही अधिकाऱ्यांनी भक्तांवर पुष्पवृष्टी केली होती. तसेच आज आयुक्त, डीएम आणि इतर बड्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून देखील पुष्पवृष्टी केल्याचे समोर आले.
मेरठ जिल्ह्यात भक्तांचे स्वागत करण्यासाठी डीएम आणि एसएसपी यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. पोलीस लाईन, बेगमपुल, शिवाय टोल, मातौर, साकोटी, दादरी, खतौली, सालावा, नानू पुल, पुथखास पुल, जानी पुल, निवारी, मोहिदिनपूर, परतापूर इंटरचेज, सुभारती, कंकरखेडा उड्डाणपूल मार्गे आघडनाथ मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.