नवी दिल्ली : भाजपच्या तामिळनाडूमधील दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये हा वाद एवढा वाढला कि दोन्ही गटाने एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, तमिळनाडूतील ऋषवंदियम, शंकरपुरम आणि कल्लाकुरीची मतदारसंघांसाठी शक्ती केंद्राच्या पदांना परवानगी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीची एक बैठक शंकरपुरम येथील एका वेडिंग हॉलमध्ये बोलावण्यात आली होती. याच ठिकाणी हा राडा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपच्या बैठकीत कल्लाकुरीची जिल्हा भाजपा प्रमुखांनी शक्ती केंद्र सदस्यांची नावे बदलल्याचा आरोप केला आहे. याबाबत अरुर रवी आणि वेस्ट यूनियन सचिव रामचंद्रन यांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली. याच दरम्यान आरूर रवी आणि रामचंद्रन यांच्या समर्थकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, अलीकडेच दिल्लीतही राजकीय पक्षांमध्ये मारामारी आणि खुर्च्या फेकण्याचे प्रकरण समोर आले होते. खरं तर, दिल्लीतील एमसीडी निवडणुकीनंतर महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान शुक्रवारी नागरी केंद्रात आम आदमी पार्टी आणि भाजपाचे नगरसेवक आमनेसामने आले. यावेळी सभागृहात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाली.