श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नेवासे ते श्रीरामपूर ट्रॅक्टर ट्रॉली रॅली काढण्यात आली.
250 हून अधिक ट्रॅक्टर यात सहभागी झाले होते. बाजार समितीजवळ रॅली अडविल्याने पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. नंतर प्रांत कार्यालयासमोर आल्यानंतर प्रांताधिकारी किरण सावंत यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा तसेच हमीभावाचा भावाचा कायदा करून स्वामीनाथन आयोग लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात आली होती.
सकाळी नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरापासून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर रॅली श्रीरामपूरच्या दिशेने निघाली.श्रीरामपूर शहरात दुपारी अडीचच्या सुमारास रॅली दाखल झाली. दरम्यान, श्रीरामपूर बाजार समिती समोर रॅली बॅरिकेट लावून अडविण्यात आली.
त्यामुळे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड.अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांची पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याबरोबर बाचाबाची झाली.
पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी भाषा वापरल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. शेतकरी आंदोलकांनी फक्त २० ट्रॅक्टर शहरात न्यावेत, अशी विनंती केली.
परंतु, आंदोलकांनी सर्व सुमारे १०० हून अधिक ट्रॅक्टर शहरात नेणारच अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी समंजस्याची भूमिका घेतल्याने आंदोलकांनी पुढे वाटचाल केली. महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार, हातात कांद्याची माळ व पायावर दूध ओतून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करून सरकार विरोधी घोषणा देण्यात आला.
त्यानंतर आंदोलकांनी रॅलीने जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. संध्याकाळी पाच वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
शेतकऱ्यांना अफूची शेती परवाना द्या
आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी सरकार व प्रशासनाकडे आम्हाला अफूची शेती करण्याचा परवाना देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. सध्या अफूच्या शेतीचा परवाना काही मर्यादित शेतकऱ्यांना आणि नियुक्त केलेल्या जिल्ह्यांमध्ये दिला जातो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना तो परवाना दिला जावा ,अशी मागणीही करण्यात आली.