– आशिष निनगुरकर
गणेशोत्सव म्हटले की आपल्या सर्वांच्या मनात अमाप उत्साह दाटून येतो. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आपण उत्सुक असतो. आजवर अनेक मराठी व हिंदी सिनेमांमध्ये “बाप्पा’ची गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप…
आपल्याकडच्या चित्रपटसृष्टीने देखील वेळोवेळी आपले बाप्पा प्रेम दाखवले आहे. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असा हा गणपती! अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत बाप्पावरील गाणी चित्रित झाली आहेत. निरनिराळ्या गणपती मंडळांच्या मंडपात वाजणारी ही गाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ताल धरायला लावतात. अनेक प्रसंगातून, कथेला पुढे येणारे वळण या गणेश गीतांमधून समोर आले आहे.
बॉलीवूडचे अभिनेते सलमान खानपासून हृतिक रोशनपर्यंत आणि शाहरुख खानपासून संजय दत्त ते वरुण धवन असे अनेक आघाडीचे नायक या गणपती बाप्पांच्या गीतांमध्ये दिसले आहेत. शब्द, संगीत आणि चित्रपटातील सिच्युएशन यांमुळे ही गाणी गणेशोत्सवात चार चॉंद लावतात आणि आपला उत्सवाचा मूड आणखी द्विगुणित करतात. हा उत्साह वाढवण्यास बाप्पांची ही गाणी महत्त्वाची ठरतात.
1978 साली आलेल्या “अष्टविनायक’ या सिनेमातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे गाणे आजही या गणेश गीतांमध्ये प्रथम क्रमांकावर असावे. अवधूत गुप्ते यांच्या “मोरया’ चित्रपटातील “लंबोदर गजमुख मेरे मोरया’ ही कव्वाली असो की “उलाढाल’ चित्रपटातील “मोरया मोरया’ या सगळ्या गाण्यांवर पावले थिरकणार नाहीत असे होणारच नाही. अजय अतुल यांच्या “मोरया मोरया’ या गाण्याने तर आधीचे सारे विक्रम मोडीत काढले.
हिंदी सिनेमाही याला अपवाद नाही. अनेक सिनेमांमधून बाप्पाची गाणी आपल्या भेटीला येतात. 1951 सालचा “गणेशजन्म’ हा चित्रपट असो की, 1979 साली आलेला “हमसे बढकर कौन’ या सिनेमातील “देवा हो देवा गणपती देवा’ हे गाणे या साऱ्याच गणेशगीतांनी आपले उत्सवाचे रंग खुलवले आहेत. “देवा हो देवा गणपती देवा’ हे गाणं रफीने गायलं होतं आणि अमजद खानवर चित्रित झालं होतं.
“ढगाला लागली कळ’ या मूळच्या मराठी गाण्याची प्रेरणा घेऊन आयुष्मान खुराना, नुशरत भरूचा, रितेश देशमुख यांच्यावर चित्रित “ड्रीम गर्ल’ सिनेमातील हे गाणे ऐकल्यावर तुम्हाला देखील या गाण्यावर नाचण्याचा मोह आवरणार नाही. मीत ब्रदर्स, मिका सिंग, ज्योतिका तांग्री यांनी गायलेले हे गाणे गणेश उत्सवात लोकप्रिय ठरले आहे.
1982 साली अभिनेता सुनील दत्त यांच्या “दर्द का रिश्ता’ या सिनेमातील “गणपती बाप्पा मोरया’ हे गाणे आजही मनाला भिडते. हरीहरन यांनी गायलेले हे गाणे सुनील दत्त यांच्यावर चित्रित झाले होते. अतिशय हृदय हेलावून सोडणाऱ्या या कथेतील “गणपती बाप्पा मोरया’ हे गाणे आजवरच्या गणेश गीतांमध्ये वेगळे ठरले आहे. हिंदी सिनेमात अलीकडे गणपतीच्या गाण्यांची संख्या वाढू लागली आहे.
1980 सालच्या “टक्कर’ सिनेमात “मूर्ती गणेश की अंदर दौलत देशकी’ या गाण्यावर संजीवकुमार व जितेंद्र थिरकले खरे; पण साउथचा शिक्का या गाण्यावर दिसतो. संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले, अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले “अग्निपथ’ चित्रपटातील “देवा श्रीगणेशा’ हे गाणे गणेश भक्तांच्या पसंतीचे गाणे अजय गोगावले याने गायले आहे आणि हृतिक रोशन या अभिनेत्यावर चित्रित केलेले आहे, जे अतिशय श्रवणीय आणि थक्क करायला लावणारे आहे.
“एनी बडी कॅन डान्स’ या सिनेमातील “साड्डा दिल वी तू’ हे गाणे एक प्यूअर डान्स नंबर आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स असलेले हे गाणे ऐकताना कधी पावले ताल धरतात कळतच नाही. गायिका हार्ड कौर हिने गायलेले हे गाणे, गणपती आरतीच्या फ्यूजनमुळे अतिशय उत्साहवर्धक झाले आहे. जे गणेशाला समर्पित आहे. जवळपास सगळ्याच गणपती मंडपात वाजवले जाणारे हे “तेरा ही जलवा’ गाणे जरी भक्तीगीत नसले तरी पावले थिरकायला लावणारे नक्कीच आहे. “वॉन्टेड’ सिनेमातील गणेश विसर्जनाच्या गाण्यात आपल्याला अभिनेता सलमान खान या गाण्यावर आपल्या युनिक डान्स स्टेपवर थिरकताना दिसतो.
“बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील “गजानना गजानना गणराया… सिद्धीविनायका’ हे गणेश गीत खूपच रोमांचक आहे. हे गाणे रणवीर-प्रियांका यांच्यावर आहे. हे गाणे लॉंच करताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी मानवी साखळीद्वारे गणेशाची प्रचंड मोठी एक इमेज साकारली होती. “डॉन’ चित्रपटातील शाहरुख खान याच्यावर चित्रित गाणे फेस्टिव्हल मूड वाढवणारे आहे. गणपती विसर्जनाच्या वेळचे हे गाणे भक्तांना उत्साहित करणारे आहे. शंकर महादेवन यांनी गायलेले आणि मुंबईच्या विसर्जन मिरवणुकीत चित्रित झालेले हे गाणे प्रत्येकाच्या मनातील बाप्पा विषयीचे प्रेम दाखवते आणि एकतेची भावना वाढवते.
अमिताभ बच्चन आणि शर्मिला टागोर यांच्या “विरुद्ध’ चित्रपटातील गणपतीचे गाणे “श्री गणेशाय धीमही’ हे गाणे मनाला भिडणारे आहे. तसेच “डॅडी’ चित्रपटातील “बाप्पा’ हे गाणेही या उत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे. या चित्रपटात रितेश देशमुखची महत्त्वाची भूमिका बघायला मिळते. वरुण धवनच्या “जुडवा 2′ चित्रपटातील “गणपती बाप्पा मोरया’ हे गाणे देखील अत्यंत खास आहे. सलमान खानच्या “अंतिम’ चित्रपटातील “विघ्नहर्ता’ हे गाणे गणेशपूजेसाठी स्पेशल आहे.
मुंबईतला भव्य आणि दिव्य गणेशोत्सवाचे आकर्षण फिल्मी दुनियेला आहे. मराठी भक्तीगीतात गणेशाची अनेक रूप मनाला मोहून टाकतात. “दगडी चाळ’ मध्ये अंकुश चौधरी वर चित्रित “मोरया मोरया’ भन्नाट होतं. 2015 साली दिवाळीत आलेल्या “कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील “सूर निरागस हो’ या शंकर महादेवन यांनी गायलेल्या गीतातून गणेशाचे दर्शन घडले. “तूच सुखकर्ता तूच दुख हर्ता अवघ्या दिनांच्या नाथा बप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा’, हे प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं कित्येक वर्षांपूर्वीचे भक्तीगीत आजही हमखास आठवते.
फार पूर्वी आशालता बाबगावकर यांचे मुंबई आकाशवाणीवर “तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया’ हे गीत आवर्जून लागायचे. या गीताची खुमारी मात्र अजूनही कमी होत नाही. त्यामुळे सिनेमातील कलाविश्वाचे गणरायाशी अतूट असे नाते आहे. त्याचे पूर्ण प्रतिबिंब सिनेमात बघायला मिळते.