मुंबई : नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयात ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मते फोडण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून प्रतिक्रिया देताना मोठी चूक झाली.
चित्रा वाघ यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये महाविकास आघाडीवर निशाणा साधत भाजपच्या विजयाचं विश्लेषण केलं. मात्र इथेच चूक झाली. आपल्या ट्विटमध्ये चित्र वाघ म्हणाल्या की, ‘मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री सर्व सरकारी यंत्रणा तिघाडीची असूनही जनतेनं भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यांच्या बाजूनं कौल दिला. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. या निकालाचा अर्थ शिवसेनेचा बाण भरकटलाय, घड्याळाचं टाईमिंग चुकलंय, जनतेनं काँग्रेसची साथ सोडलीय.’
ताई, ही निवडणूक जनतेची नव्हती, तर नगरसेवक-जिप सदस्यांची होती !
माहितीस्तव सादर. https://t.co/q4IatZZEQv— Satyajeet Tambe (@satyajeettambe) December 14, 2021
याला काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी चित्रा वाघ यांच्या ट्विटला रिट्विट करत चोख प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘ताई, ही निवडणूक जनतेची नव्हती, तर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची होती. माहितीस्तव सादर,’ असं म्हटलं आहे.