पिंपरी – चिंचवड, आकुर्डी, देहूरोड व तळेगाव दाभाडे या चार रेल्वे स्थानकांचा अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनचा विस्तार, सुशोभीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात विस्तारीकरण होणाऱ्या आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि.3) ऑनलाइन माध्यमातून होणार आहे.
रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन ही योजना हाती घेतली आहे. या योजनेत मावळ लोकसभा मतदार संघामधील रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे या चार स्टेशनचे योजनेत समावेश झाला. पहिल्या टप्प्यातील आकुर्डी आणि तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारीकरण, सुशोभीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन होणार आहे.
विस्तारीकरणात काय होणार
या योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी 40 कोटी 35 लाख तर आकुर्डी रेल्वे स्थानकासाठी 33 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकावर फुटओव्हर ब्रीज, प्रतीक्षा रुम, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगांसाठी सोयी-सुविधा, पर्यावरणपूरक वातारण, आवश्यकतेनुसार लिफ्ट, मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा, शेड उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
भारत रेल्वे स्टेशन योजने अंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे या चार स्टेशनचा कायापालट होणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन स्टेशनच्या कामाला रविवारी प्रारंभ होईल. आगामी काळात मतदारसंघातील सर्व रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण केले जाणार आहे. लोणावळ्यात ओव्हर ब्रीज उभारण्यात येणार आहे.
-श्रीरंग बारणे;खासदार मावळ