बीजिंग – कोविड बाबतचे चीनचे “झिरो टोलरन्स’चे धोरण स्थायी किंवा टिकावू नाही, अशी टिप्पणी केल्याबद्दल चीनने जागतिक आरोग्य संघटनेवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. करोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी चीनने लागू केलेल्या या धोरणानुसार चीनमधील अनेक शहरांमध्ये नागरिकांच्या हालचालींवर कमी अधिक प्रमाणात निर्बंध लागू केले गेले आहेत.
सर्वाधिक निर्बंध शांघाय या शहरावर लागू केले गेले आहेत. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून शांघायवरचे निर्बंध कायम आहेत. अजूनही हे निर्बंध हटवले गेलेले नाहीत. जगभरात अन्यत्र मात्र लोकांनी या विषाणूबरोबरच रहाण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. याच संदर्भाने मंगळवारी बोलताना “चीनचे “झिरो टॉलरन्स’ धोरण टिकाऊ नाही.’ असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस म्हणाले.
मात्र त्यांच्या या वक्तव्यावर चीनने कडवट प्रतिक्रिया दिली आहे.आम्हाला आशा आहे की संबंधित व्यक्ती चिनी कोविड-19 धोरण वस्तुनिष्ठ आणि तर्कशुद्धपणे पाहू शकेल आणि बेजबाबदार टीका करण्याऐवजी वस्तुस्थिती जाणून घेईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान म्हणाले, चीनच्या या धोरणावर टीका करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही चीनच्या प्रशासनाने गेल्या आठवड्यात दिला होता.
करोनाच्या साथीच्या प्रारंभीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनची पाठराखण केला जात असल्याचा आरोप देखील केला जात होता. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने हे आरोप फेटाळले होते.