बीजिंग – चीनचे यान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले असल्याची अधिकृत घोषणा चीन सरकारने केली आहे. 1970 नंतर मानवाने सोडलेले यान प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले आहे. चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चांग 5 हे यान स्थानिक प्रमाण वेळेनुसार मंगळवारी रात्री अकराच्या किंचित आधी चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले. तेथे पोहोचलेल्या यानाने पृष्ठभागाचे जे फोटो पाठवले आहेत तेही चीनने प्रसारीत केले आहेत.
गेल्या 24 नोव्हेंबर रोजी या यानाचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण करण्यात आले होते. चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि दगडाचे नमुने हे यान पृथ्वीवर घेऊन येणार आहे. त्यानंतर चंद्रावर मानव पाठवण्याची मोहीम चीनकडून हाती घेतली जाणार असून त्या मोहिमेतील हा पहिला टप्पा आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर रोबोद्वारे दोन दिवस खाणकाम केले जाणार आहे. त्यातून दोन किलो खणून काढलेली माती संकलित करून ती येथे आणली जाणार आहे. या महिन्याच्या मध्याला चंद्रावरची ही माती पृथ्वीवर आणली जाईल. मंगोलियाच्या अंतर्गत भागात चीनवरून आणलेली माती उतरवली जाणार आहे.
चंद्रावरील दगड किंवा मातींचे अंश पुढील संशोधनासाठी उपयोगी पडणार आहे. त्यातीाल काही भाग अन्य देशांतील वैज्ञानिक संस्थांनाही संशोधनासाठी दिली जाईल. त्यातून चंद्राच्या भौगोलिक माहितीविषयी अधिक संशोधन केले जाणार आहे.
अमेरिकेने आपल्या विविध मोहिमांद्वारे चंद्रावरील दगड आणि मातीचे सुमारे 382 किलोचे नमुने पृथ्वीवर आणले आहेत. त्यानंतर प्रथमच चीनने हे नमुने आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. चीनची चंद्रावरील आत्तापर्यंतची ही तिसरी यशस्वी मोहीम आहे.