कराड – मलकापूर शहरातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण लक्षात घेता आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने मलकापूर पालिकेने दुरदृष्टी ठेवून केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानाअंतर्गत चोवीस तास नळ पाणीपुरवठा योजना विस्तार व बळकटीकरणाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.
कै. आ. भास्करराव शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली चोवीस तास नळ पाणीपुरवठा योजना तत्कालिन ग्रामपंचायत, नगरपंचायत व सध्याच्या नगरपालिकेने सन 2009 पासून अखंडितपणे कार्यरत ठेवली आहे. या योजनेस 2011 सालचे नॅशनल अर्बन वॉटर वार्ड, पंतप्रधान पुरस्कार, नुकतेच दि. 17 रोजी नवी दिल्ली येथे उत्कृष्ठ पाणी वितरण व व्यवस्थापन अंतर्गत देशातील तृतीय क्रमांकाचे राष्ट्रीय पारितोषिक, सन 2013 चा महाराष्ट्र उर्जा अभिकरण महामंडळाचा वीजबचतीचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, सध्याच्या अंदाजे 45000 लोकसंख्येस पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना 20-22 तास पंपिंग करुन चालविली जात आहे. त्यामुळे भविष्यात मलकापूर शहराची लोकसंख्या वाढीचा विचार करुन केंद्र शासनाचे अमृत 2.0 अभियानाअंतर्गत चोवीस तास नळ पाणीपुरवठा योजना विस्तार व बळकटीकरणाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने दि. 8 डिसेंबर 2022 रोजी सदर योजनेस मान्यता देऊन अंतीम मंजूरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता. याअनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांनी सदर प्रस्तावास मान्यता देण्याबाबत शिफारस पत्र दिले होते.
या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. 9 रोजी मान्यता दिली आहे. ही मलकापूर वासियांसाठी दिवाळी भेट ठरली आहे. याकामी राज्याचे उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. सतेज पाटील, आ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीय उदयसिंह पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.
मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, सौ. कमल कुराडे, सौ.नंदा भोसले, तत्कालिन मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पराग कोडगुले, तसेच सध्याचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, आत्माराम मोहिते, सौ.प्रिया तारळेकर, जगन्नाथ मुडे, रविंद्रनाथ टिळे यांनी सदर प्रस्ताव पाठपुरावा करण्यासाठी व प्रस्ताव तयार करण्यासाठी सर्व नगरसेवक, अधिकाऱ्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले आहे.