नाशिक – नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या गटाने विजय मिळवला आहे. 18 पैकी 13 जागांवर छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरीत पाच जागांमध्ये अपक्ष दोन आणि शिंदे गटाला तीन जागांवर विजय मिळवता आला आहे. तर दराडे गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. भुजबळ समर्थकांकडून येवल्यात फटाक्यांची आतिषबाजी गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला जात आहे.
तर नाशिक जिल्ह्यातील अद्वय हिरे गटाने सरशी घेतली आहे. त्यामुळे दादा भुसे यांच्या गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. मालेगाव बाजार समितीत सोसायटी गटाच्या 11 जागांची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून यात 11 पैकी 10 जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडी प्रणीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलला मिळाले आहेत. त्यामुळे हिरे समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान राडा
दुसरीकडे, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान तुफान राडा झाला आहे. यावेळी लोकमान्य परिवर्तन पॅनलचे नेते, ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम आणि अपक्ष उमेदवार यतीन कदम मतमोजणी केंद्रावर येताच तुफान राडा झाला. पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीत फेर मतमोजणीच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.