लुटीसाठी तरुणाला घातल्या गोळ्या

मारेकऱ्यांचा कबुलीनामा : ज्ञानेश्‍वर वरबडे खुनाचा छडा

लुटारूंचे “नागपूर कनेक्‍शन’

राज्याच्या उपराजधानीतील आलेल्या वैभव आणि दिगंबर हे दोघे खेड तालुक्‍यातील शिंदे वासुली गावात गेल्या काही काळात वास्तव्य करीत होते. या दोघांवर पुणे, नागपूर, नाशिक अशा प्रमुख शहरामध्ये जात चोरी, दरोडे घालत असल्याची बाब उजेडात आले आहे. याशिवाय हे सराईत असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे.

इंदोरी – लुटमारीनंतर ओला कंपनीच्या कॅब चालकाचा गोळ्या घालून निर्घृण खून केला. पैसे मिळाल्यानंतर त्याला गोळ्या घातल्याची आरोपींनी कबूल केले आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी आणि गुन्हे शाखा युनीट दोनच्या पोलिसांनी दोघांना नागपूरमधून अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून दोन गावठी कट्‌टे, 31 जिवंत काडतुसे आणि एक चाकू जप्त केली आहेत.

वैभव उर्फ पिंटू धनराज बीजेवार (वय 33, रा. हनुमान गल्ली, नागपूर), दिगंबर उर्फ अक्षय मधुकर मेश्राम (वय 25, रा. मोर्शी, अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इंदोरी (ता. मावळ) येथील जांबवडे इंदोरी रोडवर ज्ञानेश्‍वर किसन वरबडे (वय 22, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी चिखली) या तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करुन त्याचा खून करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्‍वर ओला कॅब चालवत होता. 20 मे रोजी वैभव आणि दिगंबर यांनी ज्ञानेश्‍वर याची कॅब ताथवडेमधून बुक केली. बराच वेळ दोघांनी कॅब फिरवली. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरी गावात आल्यानंतर दोघांनी ज्ञानेश्‍वरच्या पोटात दोन गोळ्या घालून खून केला. आरोपींनी ज्ञानेश्‍वरचे एटीएम कार्ड आणि मोटार घेऊन पोबारा केला. तळेगाव एमआयडीसी पोलिसांना घटनेचीमाहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांना ज्ञानेश्‍वरची ओळख पटली नाही.

पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनीट दोनचे पोलीस संयुक्तरित्या करीत होते. तांत्रिक आणि अन्य मुद्‌द्‌यांचा तपास घेत पोलिसांनी ज्ञानेश्‍वरची ओळख पटली. तो ओला कॅब चालविण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना त्याची ओला कॅब खेड तालुक्‍यातील सावदरी येथे मिळाली. कॅबमधील बुकिंग टॅबलेटच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

वैभव आणि दिगंबर हे खून केल्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर नागपूर येथे गेल्याचे पोलिसांना तांत्रिक तपासात आढळले. दरम्यान त्यांनी ज्ञानेश्‍वर याच्या एटीएममधून 13 हजार 500 रुपये काढून घेतले. गुन्हे शाखा युनिट दोन आणि तळेगाव एमआयडीसी पोलिसांचे संयुक्‍त पथक नागपूरला तात्काळ रवाना झाले. पोलिसांनी दोघांना नागपूरमधून ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे, 31 जिवंत काडतुसे व एक लोखंडी चाकू जप्त केला. जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने हा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्‍त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, साधना पाटील, पोलीस कर्मचारी मयूर वाडकर, प्रशांत सोरटे, सुधीर वाडीले, नितीन तारडे, नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, एकनाथ कोकणे, फारूक मुल्ला, प्रवीण दळे, नारायण जाधव, संदीप ठाकरे, संजय गवारे, हजरत पठाण, सतीश कुदळे, तुषार शेटे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.