प्रा. शुभांगी कुलकर्णी
आपले लग्न धूमधडाक्यात व्हावे, शेकडो लोकांची गर्दी व्हावी, ही प्रक्रिया हल्लीची पिढी खर्चिक आणि अनावश्यक मानू लागली आहे. नवीन पिढी मोजक्या व्यक्तींसह एखाद्या खास ठिकाणी जाऊन आपल्या लग्नाचे क्षण एन्जॉय करू इच्छिते. करोनाच्या प्रसारामुळे अशा प्रकारच्या मायक्रो वेडिंगच्या ट्रेन्डला प्रोत्साहनच मिळाले आहे. हा ट्रेन्ड यापुढेही बऱ्याच प्रमाणात कायम राहील, अशी चिन्हे आहेत.
गेल्या वीस ते तीस वर्षांमध्ये लोकांचा लग्नावरील खर्च प्रचंड प्रमाणात वाढला होता आणि लग्न समारंभ हे एखाद्या मोठ्या उत्सवाप्रमाणे भासू लागले होते. विवाह समारंभ संस्मरणीय बनविण्यासाठी हजार-बाराशे लोकांना आमंत्रित केले जात होते. काही ठिकाणी तर पाहुण्यांची गर्दी याहूनही अधिक दिसत असे. अशा प्रकारे लग्नसमारंभांवर पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागला. परंतु युवा पिढीला ही अनावश्यक गर्दी आणि पैशांचा अपव्यय या दोन्ही गोष्टी हळूहळू खटकू लागल्या. त्यातूनच पाहुण्यांच्या संख्येत कपात होऊ लागली. उरलीसुरली कसर करोनाने भरून काढली. लोकांची कमाई या काळात घटली आणि दुसरीकडे गर्दीमुळे संसर्ग पसरण्याचा धोकाही समोर उभा ठाकला. त्यातूनच आता “मायक्रो वेडिंग’ ही संकल्पना लोकप्रिय झाली आहे.
नव्या पिढीला लग्न हा “सार्वजनिक समारंभ’ वाटत नाही तर अत्यंत “खासगी प्रसंग’ वाटतो, हा मानसिकतेतील मोठा बदल आहे. तरुण वर्गाला आपल्या लग्नात भरमसाठ गर्दीऐवजी मूठभर खास पाहुणे उपस्थित असावेत, असे वाटते. त्यात अगदी जवळचे मित्र आणि जवळच्या नातेवाईकांना समाविष्ट करून घ्यावे, असे तरुण-तरुणींना वाटते. मायक्रो वेडिंग या संकल्पनेचा अर्थच मुळात असा की, कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न! करोना काळात तर कोणत्याही समारंभात जास्तीत जास्त लोकांची मर्यादाच ठरवून देण्यात आली आहे. कमीत कमी लोक असतील तरच संसर्ग दूर ठेवणे शक्य आहे. त्यामुळेही बहुसंख्य लोक आता मायक्रो वेडिंगला महत्त्व देऊ लागले आहेत.
आपल्या विवाहासंबंधी सर्वांना माहिती झालीच पाहिजे, असे काही लोकांना वाटते. विशेषतः नवरा मुलगा किंवा मुलगी यांच्या आईवडिलांना तसे वाटत असते. अशा स्थितीत तरुण जोडपी सोशल मीडियाचा आधार घेतात. आजकाल प्रत्येकाजवळ क्षणाक्षणाची छायाचित्रे आणि व्हिडिओ असतात. ते ही मंडळी सोशल मीडियावर हवे तेव्हा शेअर करू शकतात. काही जण तर लग्नाची वेबसाइट तयार करून त्यावरही छायाचित्रे आणि व्हिडिओ अपलोड करीत राहतात. अशी छायाचित्रे आणि व्हिडिओ आजन्म शाबूत राहतात. लोकांनी पाठविलेल्या शुभेच्छाही याच वेबसाइटवर अपलोड केल्या जातात.
वेडिंग प्लॅनर म्हणून काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या मते, आजची पिढी “मिनिमलिस्ट ऍटिट्यूड’ ठेवून लग्नाच्या दिवसातील प्रत्येक क्षण हे तरुण-तरुणी एन्जॉय करू पाहतात; संस्मरणीय करू पाहतात. त्यांना असे वाटते की, त्यांचे आई-वडील, भाऊ-बहीण किंवा मित्र यांची धावपळ होऊ नये आणि त्या सर्वांना अत्यंत मोकळेपणाने लग्नसमारंभ एन्जॉय करता यावा. त्यामुळे लग्न हा पूर्णपणे “प्रायव्हेट प्रोग्राम’ बनविला जातो.
मायक्रो वेडिंगसाठी जोडपी अनेकविध मार्ग अवलंबितात. काही जण शहरापासून दूर एखाद्या रिसॉर्टमध्ये किंवा काहीजण एखाद्या पर्यटनस्थळी जाऊन लग्न करण्याचे नियोजन करतात. एका फॅशन डिझाइनरने शेअर केलेल्या अनुभवानुसार, त्यांच्या एका क्लाएन्टने असा लग्नसमारंभ आयोजित केला होता की तो एका बेटावर होता. वधु-वरांव्यतिरिक्त त्या बेटावर अवघे पन्नास लोकच होते. सर्व लग्नविधी पार पाडण्याबरोबरच मोजक्या पाहुण्यांनी पर्यटनाचा आनंदही मनसोक्त लुटला. खूप मौजमजा केली. हे लग्न केवळ वधु-वरांनाच नव्हे तर सर्व पाहुण्यांना आजन्म आठवणीत राहील, असे झाले. अशाच प्रकारे अनेक जण थंड हवेच्या ठिकाणी, समुद्रकिनारी, बगीचात, अम्युजमेन्ट पार्कमध्ये आपल्या लग्नाचे नियोजन करू लागले आहेत.
आजकालचे युवक आपले करिअर झाल्यानंतरच लग्नाचा विचार करतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या ते परिपक्व झालेले असतात.
त्याचबरोबर त्यांच्या हातात पैसा खेळत असतो. त्यामुळे सर्वकाही ते आपल्या पैशांनी, आपल्या बजेटमध्ये बसेल अशा बेताने प्लॅन करू पाहतात. बॅंडबाजा, फूलवाले, मंगल कार्यालये, स्वयंपाकी आदींना एकत्रित आणून लग्नाचे नियोजन करण्याइतका वेळही आजकालच्या पिढीकडे नसतो. त्यामुळे ते हॉटेलमध्ये लग्न करणे पसंत करतात. त्या ठिकाणी खाण्यापिण्याची, सजावटीची, संगीताची आणि इव्हेन्ट मॅनेजमेन्टची सर्व तयारी ते आपल्या मनानुसार हॉटेल चालकाकडून करून घेऊ शकतात. वर किंवा वधू पक्षाला केवळ उचलून पैसे द्यावे लागतात. याही ठिकाणी अत्यंत मोजक्या संख्येने पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. काहीजण लग्नाच्या ठिकाणी मॅरेज रजिस्ट्रारलाही बोलावतात. काहीजण तर कोर्टात लग्न करून रिसेप्शनचे आयोजन करतात.
यासंदर्भात लग्नाशी संबंधित एक अनुभवी छायाचित्रकार सांगतात की, मी आतापर्यंत डझनावारी मायक्रो वेडिंगची फोटोग्राफी केली आहे. वेगवेगळ्या लोकांशी बातचीत करून आज युवकांचा जो दृष्टिकोन माझ्या लक्षात आला आहे, त्यानुसार लग्नकार्यात नवरा मुलगा आणि मुलगी यांना एन्जॉय करण्याची संधी मिळायला हवी, असे वाटते. त्यामुळे प्रचंड गर्दी जमा करणे, आतापर्यंतच्या परंपरा यांच्याशी युवकांना काहीही देणेघेणे नाही. वेडिंगमध्ये संपूर्ण “फोकस’ आपल्या दोघांवरच असला पाहिजे, असे त्यांना वाटते आणि पाहुण्यांची वास्तपुस्त करण्यात वेळ घालवू नये, अशीही त्यांची इच्छा असते. याच सर्व बाबींमुळे मायक्रो वेडिंग आजकाल अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागले आहे.
आजकाल सेलिब्रिटीज्सुद्धा मायक्रो वेडिंगचा पर्याय निवडताना दिसत आहेत. अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांनी “लो प्रोफाइल वेडिंग’ केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन साधेपणाने लग्न केले. त्याचप्रमाणे अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने गोव्यात मायक्रो वेडिंग आयोजित करून एंजॉय केले. या लग्नात खूपच कमी लोक उपस्थित होते. अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता यांनीही केवळ मोजके खास मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीतच लग्न केले होते.