नवी दिल्ली – 2021 साली 15 सप्टेंबर रोजी पंजाबमधील जलालाबादेत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने 6 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये पाकिस्तानस्थित खलिस्तानी हस्तक लखबीर सिंग रोडे याचाही समावेश आहे. या बॉम्बस्फोटात बिंदर सिंग या बॉमब पेरणाऱ्याचाही मृत्यू झाला होता.
लखबीर सिंग रोडे हा “इंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन’ या पाकिस्तानातील खलिस्तानवादी संघटनेचा स्वयंघोषित म्होरक्या असून तो आणि त्याच्या साथीदारांनी मिळून पंजाबमध्ये विविध ठिकाणी अस्थिरता माजवण्यासाठी बॉम्बस्फोट घडवले असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे, असे “एनआयए’ने म्हटले आहे.
रोडेच्या सूचनेनुसार पाकिस्तानातील नार्को टेरर हस्तक हबिब खान उर्फ डॉक्टर याने बलविंदर सिंग आणि सुखविंदर सिंग यांना भडकावून बॉम्ब पेरण्याची जबाबदारी सोपवली होती. जलालाबादेत बॉम्ब पेरण्यापूर्वी या दहशतवाद्यांनी एक कार देखील पेटवून दिली होती, असेही “एनआयए’ने म्हटले आहे.