नवी दिल्ली – सीबीआयने 3,600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅंड घोटाळा प्रकरणात माजी संरक्षण सचिव शशीकांत शर्मा आणि भारतीय हवाई दलाच्या चार माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. शर्मा हे कॅगचे माजी प्रमुखही आहेत.
शर्मा हे 2011 ते 2013 दरम्यान संरक्षण खात्याचे सचिव होते व त्यानंतर त्यांची महालेखापाल म्हणून नियुक्ती झाली होती.
केंद्रीय तपास एजन्सीने तत्कालीन एअर व्हाइस मार्शल जसबीर सिंग पानेसर (आता निवृत्त), उपमुख्य चाचणी पायलट एस ए कुंटे, तत्कालीन विंग कमांडर थॉमस मॅथ्यू आणि ग्रुप कॅप्टन एन संतोष यांनाही आरोपी केले आहे. कुंटे आणि संतोष एअर कमोडोर म्हणून निवृत्त झाले आहेत.
ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीकडून राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि संरक्षण मंत्री या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी नवीन हेलिकॉप्टरच्या खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. युपीए सरकारच्याच काळात हा घोटाळा उघडकीला आला होता. यात हवाईदलाचेच काही अधिकारी गुंतले आहेत असे लक्षात आल्यानंतर तत्कालिन संरक्षण मंत्र्यांनी हा हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द करून संबंधीत ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांची बॅंक गॅरंटी जप्त केली होती.
एवढेच नव्हे तर त्यांनी चाचणीसाठी दिलेली तीन हेलिकॉप्टर्सही जप्त करण्यात आली होती. सीबीआयने तत्कालीन आयएएफ प्रमुख एस पी त्यागी यांच्यावरही या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यागी यांचे काही कुटुंबियही या घोटाळ्यात आरोपी आहेत. राजकीयदृष्ट्या या प्रकरणाचे मोठेच भांडवल केले गेले होते.