नवी दिल्ली -राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगढप्रमाणेच मिझोरममध्येही सत्ताबदल झाला. त्या राज्यात मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) सत्तेवरून हटवत झोरम पीपल्स मुव्हमेंटने (ZPM) बाजी मारली.
मिझोरममध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यातील २७ जागा पटकावत झेडपीएमने स्पष्ट बहुमत मिळवले. सत्ता गमावलेल्या एमएनएफला केवळ १० जागा मिळाल्या. तर, भाजपला २ आणि कॉंग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. झेडपीएमच्या झंझावातापुढे इतर पक्षांचा टिकाव लागू शकला नाही. मुख्यमंत्री झोरमथंगा आणि उपमुख्यमंत्री तॉनलुइया हे एमएनएफचे प्रमुख नेतेही निवडणुकीत पराभूत झाले.
प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये झेडपीएमचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणारे लालदुहोमा यांचा समावेश आहे. एमएनएफ, झेडपीएम आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिझोरममधील सर्व जागा लढवल्या. भाजपने २३ उमेदवार रिंगणात उतरवले. प्रथमच मिझोरमची निवडणूक लढवणाऱ्या आपनेही ४ उमेदवार दिले होते.
मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ आणि मिझोरम ही पाच राज्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियेला सामोरी गेली. मिझोरम वगळता इतर चार राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाले. ख्रिश्चनबहुल मिझोरममधून रविवारी मतमोजणी न करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. रविवार हा ख्रिश्चनांसाठी विशेष दिवस मानला जातो. त्याआधारे करण्यात आलेली मागणी मान्य करून निवडणूक आयोगाने मिझोरममध्ये सोमवारी मतमोजणी केली.