पुणे, दि. 27 -चांदणी चौक येथील उड्डाणपूल येत्या रविवारी (दि. 2 ऑक्टोबर) पहाटे 2 वाजता पाडला जाणार आहे. त्यासाठी शनिवारी (दि. 1) रात्री 11 वाजता ते रविवारी (दि. 2) सकाळी आठ वाजेपर्यंत चांदणी चौकातील वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी, तसेच मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी वाहतूक मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकरी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
मुंबईकडून येणारी जड वाहतूक तळेगाव दाभाडे टोल नाक्याच्या अलीकडे, तर साताऱ्याकडून येणारी वाहने खेड शिवापूर येथे थांबविण्यात येणार आहे. पूल पाडण्याच्या कामासाठी वाहतूक बंद कालावधीत केवळ हलक्या वाहनांसाठी मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी हलकी वाहने जुन्या पुणे-मुंबई पथकर नाक्यावरून (टोल नाका) सोमाटणे फाटा, देहू रोड, भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, खडकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्ता, कात्रज चौकातून साताऱ्याकडे जाऊ शकणार आहेत. तसेच मुंबईवरून वाकड येथे आल्यानंतर राजीव गांधी पुलावरून औंध, आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील चौक), संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्त्यावरून साताऱ्याकडे मार्गस्थ होतील. याशिवाय मुंबईवरून बाणेर येथे आल्यानंतर विद्यापीठ चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक आणि स्वारगेटवरून सातारा रस्त्यावरून साताऱ्याकडे जाता येणार आहे.
साताऱ्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी
हलक्या वाहनांसाठी साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना जुन्या बोगद्यामार्गे कात्रज-स्वारगेट-टिळक चौक-शिवाजीनगर-विद्यापीठ चौकातून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून थेट महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाता येईल. साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना दुसरा पर्यायी रस्ता नवले पूल, वडगाव पूल, सिंहगड रस्ता, राजाराम पूल, स्वर्गीय राजा मंत्री पथावरून (डीपी रस्ता), नळस्टॉप, पौड फाटा, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे जाता येईल किंवा साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना तिसरा पर्यायी रस्ता वारजे पूल, कर्वे रस्त्याने आंबेडकर चौक, वनदेवी, कर्वे पुतळा चौक, पौड फाटा, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे जाता येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.