शनिवारी होणार ऐतिहासिक लॅंडिंग
बेंगळूरु चंद्रयान -2 चे लॅंडिंग मॉड्यूल ‘विक्रम’ शनिवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर ऐतिहासिक सुखरूप लॅंडिंग करण्याच्या अंतिम उतरंडीला सुरुवात करेल, जेंव्हा “विक्रम’ लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, त्या ऐतिहासिक क्षणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’ आतूर आहे. चंद्रावरील यशस्वी लॅंडिंगमुळे रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत चौथा देश बनेल.
या ऐतिहासिक क्षणासाठी देशभरातून सुमारे 60-70 हायस्कूल विद्यार्थ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुमधील इस्रो सेंटर येथे उपस्थित राहणार आहेत. आतामध्ये ‘प्रज्ञान’ रोव्हर असलेला ‘विक्रम’ लॅन्डर 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1.30 ते 2.00 या वेळेत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
लॅंडर सध्या चंद्राच्या पृष्ठभागापासून जवळ जवळ 35 कि.मी. अंतरावर एका कक्षेमध्ये आहे. येथून त्याचा शेवटचा टप्पा सुरू होईल. “चंद्रयान -2′ सुमारे 70 अंश दक्षिणेकडील अक्षांश असलेल्या मंझिनस सी आणि सिम्पेलियस एन या दोन खड्ड्यांच्या मध्यभागी उंच मैदानात लॅंडर आणि रोव्हर उतरवण्याचा प्रयत्न करेल, असे इस्रोने म्हटले आहे.
एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठीची हालचाल पृष्ठभागापासून 30 कि.मी. पासून सुरू झाली की त्याला उतरण्यासाठी 15 मिनिटे लागतील. लॅंडरचा हा 15 मिनिटांचा प्रवास इस्त्रोसाठी नवीन आहे. जिथे वातावरण नाही, अशा ठिकाणी “इस्रो’चे यान प्रथमच जात आहे. प्रपल्शन सिस्टमचा वापर करून आम्हाला वेग मोडून यान सहजपणे जमिनीवर आणावे लागेल, असे “इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले.