नेवासा, (प्रतिनिधी) – नगर दक्षिण महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नुकतीच भेट घेऊन डॉ.सुजय विखे पाटील यांना शेवगाव तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन देत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहे.
त्यामुळे आता माजीआमदार घुले पाटील यांनी महायुतीचा धर्म पाळून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारातही सहभागी होण्याचे आव्हान भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माजी आ.घुले यांना पालकमंत्री विखे पाटील आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी दिले.
नगर दक्षिणबरोबरच माजी आ.घुले पाटील यांनी महायुतीचा धर्म पाळत शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सहभागी झाल्यास त्यांचे स्वागत करू, असे जाहीर आव्हान मुरकुटे यांनी माजी आ. घुले यांना दिल्यामुळे नेवासा तालुक्यात राजकीय कलगीतुरा रंगलेला असून मुरकुटेंच्या महायुती धर्म पाळण्याच्या आव्हानाला माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील दाद देणार का? असा सवालही यानिमित्ताने शिर्डीच्या राजकीय आखाड्यात जोरदारपणे रंगला जात आहे.