पुणे – राज्यातील पावसाचा जोर पुन्हा ओसरला असून, दि. 24 ऑगस्टपासून पश्चिमी वाऱ्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस उत्तरेकडे सरकल्यामुळे आणि कोणताही कमी दाबाचा पट्टा नसल्याने पावसाचा पुन्हा खंड पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. ताम्हिणी घाटात सर्वाधिक 75 मिमी पावसाची नोंद झाली. बहुतांश घाटमाथ्यावर 30 ते 40 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.
गेल्या 24 तासांत घाटमाथ्यावर झालेला पाऊस (मिमीमध्ये)
लोणावळा -53, शिरगाव -45, शिरोटा-60, वळवण -36, अंबवणे -35, भिवपुरी -44, धावडी-65, डुंगरवाडी-54, कोयना-38, खोपोली-37, ताम्हिणी -75, भिरा-32.
शहरात दिवसभर ऊन
शहरात दोन दिवस पावसाच्या हलक्या सरीनंतर सोमवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. दुपारनंतर ऊन आणि ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळनंतर हवेत गारवा होता. मागील दोन दिवसात शहरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे कमाल तापमानत दोन ते तीन अंशांनी घट झाली. दुपारी उपनगरातील काही भागात पावसाची भुरभूर झाली. दरम्यान, या विचित्र वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.