महाळुंगे इंगळे-येथील औद्योगिक क्षेत्रासह व्यावसायिक व घरगुती ग्राहकांकडे वीज बिलाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने चाकण सब डिव्हिजनकडून त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पाचही विभागातील थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. वीज पुरवठा सुरळीत ठरवण्यासाठी बिलाची थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन चाकण उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता राहुल डेरे व सहाय्यक अभियंता मदन मुळूक यांनी केले आहे.
चाकण महावितरण सबडिव्हिजन अंतर्गत चाकण ग्रामीण, चाकण शहर, भोसे, आळंदी शहर आणि आळंदी ग्रामीण असे एकूण पाच विभाग येतात. या पाचही विभागातील वीज ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांची जवळपास आठ कोटी, व्यावसायिक ग्राहकांची जवळपास चार कोटी आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांची आठ कोटी असे एकूण मिळून जवळपास 20 कोटींची थकबाकी आहे. आजपर्यंत जवळपास सहा कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधित ग्राहकांना नोटीस, मेसेज,फोन करून सूचना दिल्या जात असून, यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मदन मुळूक व राहुल डेरे यांनी सांगतिले.
- नोव्हेंबर 2019 अखेर पर्यंत थकबाकीचे प्रमाण शून्यावर आणावयाचे असून, त्याकामी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळत असून, महावितरणच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. त्यास या भागातील वीज ग्राहकांकडून देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-मदन मुळूक, सहायक अभियंता चाकण