नवी दिल्ली – मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालय इमारतीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गुप्तचर सतर्क झाल्या असून त्यांनी या अनुषंगाने आपली दक्षता वाढवली आहे. इंटेलिजेंस ब्युरो, रिसर्च अँड ऍनालिसिस विंग, मिलिटरी इंटेलिजन्स आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स च्या इंटेलिजेंस विंग सारख्या केंद्रीय गुप्तचर संस्था या घटनेचा तपशील गोळा करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत.
केंद्रीय गुप्तचर संस्थेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यात रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड वापरण्यात आल्याचा संशय आहे आणि ही एक असामान्य गोष्ट आहे. पूर्वी ग्रेनेड हल्ले झाले आहेत परंतु अशा पद्धतीच्या रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडचा वापर सर्वांसाठी चिंताजनक आहे. अलिकडेच हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे फडकाऊन तेथील भिंतीवर खलिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे. मोहालीतील स्फोटानंतर पंजाब पोलिसांनीही अलर्ट जारी केला आहे.
मोहाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलीस इंटेलिजेंस हेडक्वार्टरमध्ये सेक्टर 77 मध्ये संध्याकाळी 7:45 वाजता हा स्फोट झाला.हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. त्यात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. खलिस्तानी चळवळीशी संबंधीत काहीं जणांना यापुर्वी काही ठिकाणी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून आरडीएक्स सारखे स्फोटकही जप्त करण्यात आले आहे.