पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे एक अभ्यास केंद्र स्थापन करण्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत एकमताने मंजूरी देण्यात आली आहे.
विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेची गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांनी मराठा साम्राज्याचा इतिहासाचे अभ्यास केंद्र विद्यापीठात स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठा साम्राज्याचा उज्ज्वल इतिहास, त्यांचे संशोधन व उलगडा होण्यास, प्रचार व प्रसार होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ.संजय चाकणे यांच्यासह इतर सदस्यांनी विविध प्रस्तावांवर चर्चा करत सूचनाही मांडल्या. कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार हे बैठकीस उपस्थित होते.
मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे अभ्यास केंद्र स्थापन करण्यासाठी उत्तम नियोजन करण्यात येणार आहे. नामांकित इतिहास तज्ज्ञांचे सहकार्यही यासाठी घेण्यात येणार आहे. जूने व मोडी लिपीतील साहित्य, कागदपत्रांचाही सखोल अभ्यास व संशोधन करण्यात येणार आहे. कालांतराने या अभ्यास केंद्रासाठी विद्यापीठाने आवश्यक तेवढा निधी उभारुन त्याचे अध्यासन केंद्रात रुपांतर करण्याच्या सूचनाही काही सदस्यांनी मांडल्या आहेत.
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जेम्स ऍड ज्वेलरी या मुंबईतील नामांकित संस्थेबरोबर सहकार्याचा करार करुन विद्यापीठात बॅचरल ऑफ आर्टस जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरु करणार आहे. याबाबतचा प्रस्तावही कुलगुरुंनी बैठकीत मांडला होता. त्यास एकमुखाने मान्यात मिळाली आहे. यामुळे आता रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित हा कोर्स सुरु होणार आहे.
विद्यापीठ, महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षांच्या कामकाजाचा आढावाही सदस्यांनी बैठकीत घेतला. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी पूर्ण करुन त्याची अंमलबजावणी करण्याबाबत उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही सदस्यांनी मांडल्या.