-तोलणारांना कामावर रूजू करून घेण्याची मागणी
-आंदोलन राज्यव्यापी करण्याची तयारी
पुणे – तोलाईच्या प्रश्नावरून ‘गुळ-भुसार’ विभागातील तोलणारांची मागील सहा महिन्यांपासून उपासमार सुरू आहे. याच्या निषेधार्थ हमालांनी सोमवारपासून (दि.29) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. कामगारांनी हे आंदोलन राज्यव्यापी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यावर तोडगा न निघाल्यास पुढील काही दिवसांत आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत तोलणारांना भुसार बाजारातील व्यापारी काम देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका हमालांनी घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने नुकतेच बेमुदत बंद करण्याबाबत बाजार समितीला कळविले होते. त्या पार्श्वभूमीवर महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन बेमुदत बंदची घोषणा करण्यात आली.
त्यानंतर डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली हमाल भवनापासून पणन मंडळावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी महामंडळाचे सहचिटणीस हनुमंत बहिरट, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, भुसार सभापती किशोर भानुसघरे, ऍड. शारदा वाडेकर, गोरख मेंगडे, सुभाष मारणे आदी उपस्थित होते.