मुझफ्फरनगर -उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (आप) एका उमेदवाराने बुधवारी अचानकपणे समाजवादी पक्षात (सप) प्रवेश केला. विशेष म्हणजे, मतदानाच्या आदल्या दिवशी ती घडामोड घडली.
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी उद्या (गुरूवार) 58 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. त्या मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या चरथावलमध्ये आपने यावर रोशन यांना उमेदवारी दिली. मात्र, रोशन यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला आपला रामराम ठोकला. एवढेच नव्हे तर, त्यांनी तातडीने सपमध्ये प्रवेश करून त्या पक्षाचे उमेदवार पंकज मलिक यांना पाठिंबा जाहीर केला.
मलिक आणि रोशन एकत्र असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. त्या घडामोडीकडे सपने आपला दिलेला राजकीय हादरा म्हणून पाहिले जात आहे. रोशन यांच्या कृतीमुळे नाराज झालेल्या आपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यासाठी पक्षविरोधी कारवायांचे कारण देण्यात आले. रोशन यांच्या प्रवेशामुळे संबंधित मतदारसंघातील सपची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे.