बेल्हे -साकोरी (ता. जुन्नर) येथील शेतकरी खंडू सखाराम विश्वासराव यांची एक शेळी सोमवार (दि.22) च्या रात्री अडीचच्या सुमारास, तर दुसरी शेळी पहाटे 4 च्या सुमारास बिबट्याच्या हल्यात ठार झाली.
खंडू विश्वासराव यांचे साकोरीत घर आहे. घराजवळील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला, तर नळावणे (ता. जुन्नर) येथील शेतकरी रामचंद्र दशरथ गगे यांची गोठ्यात बांधलेली जरशी कालवड सोमवारी (दि. 22) रात्री एकच्या सुमारास बिबट्याने ठार केली.
याबरोबरच बाबाजी शिंदे यांची कालवड बिबट्याने ओढून नेऊन फस्त केली. सर्व घटनांचे पंचनामे करण्यात आले असून, लवकरच शासकीय नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती बेल्हे वनरक्षक दत्ता फापाळे यांनी दिली. आधीच करोनाच्या संकटामुळे नागरिक भयभीत आहेत, त्यातच आता या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.